अहमदनगर: राज्यातील शहरी भागात करोनाचा प्रादूर्भाव वाढला असतानाच, आता ग्रामीण भागातही करोनाचा फैलाव होऊ लागला आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्यापाठोपाठ आज अहमदनगरमध्येही करोनाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली आहे. दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. त्यामुळं आता राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.

दुबईहून आलेल्या ४० जणांमध्ये नगरमधील एकाच कुटुंबातील हे चौघे होते. १ मार्चला ते नगरला परत आले होते. पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यावर नगरच्या या चौघांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. मात्र आरोग्य विभागाकडून त्यांच्या अधिक तपासण्या करण्यासाठी नमुने पुण्याला पाठविण्याचा आदेश दिला गेला. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार गुरुवारी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा अहवाल आला. त्यातील एकाला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्याची प्रकृती ठीक आहे, विशेष म्हणजे बाह्य लक्षणे ही आढळून आली नाहीत. आता त्यावर पुढील उपचार होणार आहेत, संपर्कात आलेल्या इतरांचा शोध घेण्यात येऊन तपासणी होणार आहे.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here