तुषार लक्ष्मणराव हरणे (२२, रा. केकतपूर) आणि प्रतिक सुनिल धुमाळे (२१ रा. अकोट, दोघेही राहणार ह. मु. अर्जुननगर, अमरावती) यांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
संचारबंदी असल्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करत आहेत. दरम्यान, १८ नोव्हेंबरला रात्री तुषार व त्याचा मित्र प्रतिक हे दोघे दुचाकीने राजकमल चौकातून रात्री साडेदहा वाजता जात होते. त्यावेळी एसआरपीएफ जवानांनी त्यांना हटकलं. त्यामुळे या युवकांचा राग अनावर झाला. त्यांनी समोर जाऊन दुचाकी राजापेठ ते इर्विन या उड्डाणपुलावर वळवली. त्याचवेळी प्रतिकने रस्ता दुभाजकासाठी वापरण्यात येणारा सुमारे १५ किलो वजनाचा दगड उड्डाणपुलावरून खाली उभ्या असलेल्या एसआरपीएफ जवानांच्या दिशेने टाकला.
याचवेळी समोर असलेल्या युनियन बँकेच्या सुरक्षारक्षकाला हा प्रकार लक्षात येताच त्याने पोलिसांना सावध केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र घटनेनंतर दोघेही पसार झाले होते. कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल असल्यामुळे कोतवालीसह राजापेठ पोलीस त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, राजापेठचे ठाणेदार मनिष ठाकरे व त्यांच्या चमूने मागील तीन दिवसांपासून राजकमल ते राजापेठ या दरम्यान दोन्ही दिशेने असलेले विविध आस्थापनांमधील सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये दुचाकी क्रमांकासोबतच या दोघांचे चेहरेही पोलिसांना लक्षात आले. त्या आधारे पोलिसांनी सोमवारी दुपारी अर्जुननगर गाठले व तुषारला ताब्यात घेतले.
तुषार व प्रतिक हे जीवलग मित्र असून सोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. प्रतिक रहाटगाव परिसरातील एका बारमध्ये काम करतो तर तुषार खासगी वाहनचालक आहे. दोघांनाही राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ही कारवाई एसीपी भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनिष ठाकरे, सागर सरदार, छोटेलाल यादव, नीलेश गुल्हाने, दिनेश भिसे, विकास गुळदे, नरेश मोहरील यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times