नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यानंतर केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यात सर्जिकल मास्क, एन ९५ मास्कचा समावेश असेल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. ३० जूनपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात ८१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. केरळमधील तिघांना आणि दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील ७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. करोनाची लागण झालेल्या ८१ जणांमध्ये ६४ भारतीय आहेत. तर १६ जण इटलीचे आणि १ कॅनडाचा नागरिक आहे. तसंच करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेले आणि संशयितांची संख्या ४००० वर गेली आहे. त्यांच्यावरही डॉक्टरांकडून देखरेख ठेवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here