हायलाइट्स:
- भारत – बांगलादेश सीमेवरच्या सुरक्षेतील गलथान कारभार समोर
- फेसबुकद्वारे जडले नाते
- वीजाशिवाय बांगलादेशी महिला दीड वर्ष भारतात
- प्रियकराशी भांडणं झालं आणि सत्य समोर आलं…
मिळालेल्या माहितीनुसार, फरजाना खातून असं संबंधित बांगलादेशी महिलेचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’च्या माध्यमातून फरजानाची ओळख मऊमध्ये राहणाऱ्या गुलशन राजभर याच्याशी झाली होती. काही वेळातच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ‘प्रेमासाठी वाट्टेल ते…’ म्हणत फरजाना वीजाशिवाय बांगलादेशातून भारतात दाखल झाली.
कोलकात्यात पोहचल्यानंतर तिचा प्रियकर गुलशन राजभर गाडीनं तिची भेट घेण्यासाठी दाखल होत होता. काही वेळानंतर फरजानानं बनावट कागदपत्रांच्या मदतीनं आपली ओळख सोना राजभर अशी केली आणि गुलशन – फरजानानं विवाह करत आपला संसारही थाटला.
त्यानंतर फरजाना आणि गुलशननं mau शहराच्या ब्रह्मस्थान भागात भाड्यानं घरत घेत उत्तर प्रदेशात आपला संसार उभा केला. मात्र दोघांच्या संबंधात वितुष्ट आल्यानंतर प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचलं.
घरगुती हिंसाचाराचं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर आणि महिलेची खरी ओळख समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
पोलीस चौकशीत फरजाना खातून हिनं आपला गुन्हा कबूल केला. दलालाला २१ हजार रुपये देऊन आपण कोलकात्यात पोहचल्याचं तिनं सांगितलं. तसंच सीमेवर सेनेच्या दोन जवानांनी पासपोर्ट तपासल्याचीही माहिती तिनं दिलीय.
फरजानानं खोट्या कागदपत्रांच्या सहाय्यानं सोना राजभर नावानं बनावट भारतीय पासपोर्टही मिळवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजाना बांगलादेशातल्या तंगेल जिल्ह्यातील असनारा गावातील मधुपूर भागाची रहिवासी आहे.
पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई करत कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि कलम १२ पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times