हायलाइट्स:
- औरंगाबादमध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल विक्री करण्याचा निर्णय
- मनुष्यबळ कमी असल्याने पेट्रोल पंपाच्या वेळांवर आणल्या मर्यादा
- पेट्रोल पंप असोसिएशनच्या बैठकीत निर्णय
करोना लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात असल्याने त्यासाठी लागणारं मनुष्यबळ पाहता पेट्रोल पंप असोसिएशनकडून पंप चालू ठेवण्याच्या वेळांवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल विकण्यास करोना लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे. ग्राहकांकडून करोना लसीकरण प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल, डिझेल द्यायचं आहे. मागील आठवड्यात नियम पाळले नाहीत म्हणून कारवाई करून शहरातील एक आणि जिल्ह्यातील एक असे दोन पेट्रोल पंप सील करण्यात आले होते. त्यामुळे आता पेट्रोल पंप चालकांनी नियम पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेट्रोल पंप असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी यावर बोलताना म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पण यासाठी आम्हाला मनुष्यबळ वाढवावं लागणार आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करता रोजच्या वेळांमध्ये आम्ही बदल केला असून, उद्यापासून सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत पेट्रोल पंप सुरू राहतील.
नागरिकांची गैरसोय होणार
पेट्रोल पंप असोसिएशनच्या या निर्णयानंतर आता मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कारण कामावरून संध्याकाळी ७ वाजेनंतर सुटणाऱ्या लोकांना पेट्रोल मिळणार नाही. त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी त्यांना मोठं अंतर कापून शासकीय पेट्रोल पंपांवर जावं लागणार आहे. त्यामुळे या निर्णयानंतर आता प्रशासन काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times