पुण्यातील करोनाग्रस्त तिघांच्या संपर्कात आलेल्या यवतमाळमधील नऊ जणांना प्रतिबंधित उपाय म्हणून शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या थुंकीचे नमुने नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले. शुक्रवारी रात्री चौघांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यामुळे इतर पाच जणांच्या अहवालाकडे लक्ष लागून होते. पण, त्यातील दोघे पॉझिटीव्ह असल्याची माहिती शनिवारी वैद्यकीय सूत्रांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्याच्या तीन कुटुंबातील सहा पुरुष आणि चार महिला असा अकरा जणांचा ग्रुप २४ फेब्रुवारीला दुबईला गेला होता. तिथून १ मार्चला हे परत आले. मुंबई विमानतळावरील प्राथमिक तपासणीनंतर या ग्रुपमधील एक युवक पुण्याला शिक्षणानिमित्त गेला. उर्वरित नऊ जण यवतमाळला परत आले. मात्र, दुबईहून आलेल्या दोन पुणेकरांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली. त्यांच्यासोबत गेलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात आला असता यवतमाळातील दहा जण त्यांच्यासोबत विमानात होते, ही माहिती समोर आली. त्यामुळे पुण्यात थांबलेल्या युवकाचीही पुन्हा आरोग्य तपासणी करण्यात आली. इतर प्रवाशांच्या बाबतीतही संशय व्यक्त केला. यवतमाळातील हे प्रवासी दुबईहून परतल्यापासून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी वावरल्याने चिंतेत भर पडली.
करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी यवतमाळ शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्यात येणार आहे. दरम्यान, नेर येथे परदेशातून आलेल्या दोन व्यापाऱ्यांवर आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यांचा तिसरा सहकारी दोन दिवसांत येणार आहे. या तिघांचीही आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पळालेले चौघे संशयित परतले
रुग्णालयात दाखल होऊन घरी परत गेलेले करोनाचे चारही संशयित रुग्ण शनिवारी दुपारपर्यंत परत आले. करोना संशयितांचा विषय पूर्णपणे पोलिसांच्या मदतीने हाताळणे शक्य नाही. नागरिकांनी स्वत:हून सहकार्य करावे असे आवाहन करत खबरदारी म्हणून पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
नागपुरातील मेयो रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले ४ संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल शनिवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत येणार होता. त्यापूर्वीच हे चारही जण शुक्रवारी मध्यरात्री रुग्णालयातून घरी परत गेले होते. तिघांपैकी एकाच्या लहान मुलीला ताप होता. त्यामुळे तो रुग्णालयात थांबू शकत नव्हता, असे ठाकरे यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times