मुंबई- पावनखिंडीचा रणसंग्राम घडून ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘
पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती.
प्रेक्षकांची ही आतुरता आता संपणार आहे, येत्या ३१ डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. ‘पावनखिंडीचा’ थरार दर्शविणारे चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. शिवराज अष्टका’तील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे.
या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार असून मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे ‘पावनखिंड’ची शौर्यगाथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like this:
Like Loading...