मुंबई: मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. तसेच मुंबईत सर्व प्रकारच्या सहलींवरही बंदी घालण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहखात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईत करोनाचे पाच रुग्ण आढळल्याने राज्यसरकारने मुंबईतील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जीम आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि विनाकारण प्रवास करणं टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील करोनाच्या रुग्णांची संख्या रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबईतील सर्व टूर्सही रद्द करण्यात आल्या असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ३२ रुग्ण आढळून आले असून, पुणे येथे १५, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २, नवी मुंबई १ आणि औरंगाबाद १ असे एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here