हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दुःखद घटना
- जीपच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू
- जीपमधून फेरफटका मारून आणल्यानंतर मुलाला गेटवर उतरलं होतं
- जीप मागे वळवून घेताना मुलगा चाकाखाली सापडला
या घटनेचा टिळक नगर पोलीस तपास करत आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लविश असे मुलाचे नाव आहे. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. घटनेनंतर त्याची आई आणि संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
इंदूरच्या टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. येथील मुकेश कुमावतचा धाकटा भाऊ मनोज कुमावत जीप घेऊन आपल्या दीड वर्षाचा पुतण्या लविश याला फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेला होता. फेरफटका मारून घरी परतल्यानंतर त्याने लविशला घरासमोरील गेटवरच उतरवले. तिथे जीप मागे घेत असताना लविश चाकाखाली सापडला. चिमुकल्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर कुटुंबीय घरातून बाहेर धावत आले. मुलाला त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुलाची आई आणि कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. कुमावत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मिश्रा यांनी सांगितले की, जीप मागे घेताना मुलगा चाकाखाली सापडला. यात त्याचा मृत्यू झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times