मुंबई/पुणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासन खबरदारी घेत आहे. मुंबईतील भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) आज, १५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत हे उद्यान नागरिकांसाठी बंद असेल. नागरिकांनीही सहकार्य करावं, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.

दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठीची बायोमेट्रिक प्रणाली तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णयही पालिका प्रशासनानं घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत ही प्रणाली बंद राहणार आहे. या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवहीत करण्यात येणार आहे. ही नोंदवलेली हजेरी पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत संबंधित विभागप्रमुखांनी प्रणालीत मंजूर करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले. सरकारचे आदेश न पाळणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही

पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास ती परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here