हायलाइट्स:
- दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529
- ब्रिटनकडून सहा आफ्रिकी देशांत उड्डाणं रद्द
- जागतिक आरोग्य संघनेनं बोलावली आपात्कालीन बैठक
WHO नं बोलावली आपात्कालीन बैठक
याच पार्श्वभूमीवर, ‘जागतिक आरोग्य संघटने’नंही (WHO) शुक्रवारी एका आपात्कालीन बैठकीचं आयोजन केलंय. दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना मध्ये सापडलेला करोना हा नवा व्हेरियंट ‘मल्टिपल म्युटेशन’ तयार करत असल्याचं सांगण्यात आलंय.
ब्रिटनकडून उड्डाणांवर बंदी
‘युनायटेड किंगडम’ची आरोग्य तपासणी यंत्रणा UKHSA कडून करोनाच्या या नव्या स्ट्रेनविषयी माहिती जाहीर करण्यात आलीय. करोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 विषयी अधिक अभ्यास सुरू असल्याचं घोषित करण्यात आलंय. यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी, UKHSA कडून करोनाच्या नव्या व्हेरियंटची तपासणी सुरू असल्याचं ट्विट केलंय. यासाठी आणखीन डेटाची आवश्यकता असल्याचं सांगतानाच याविषयी योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सहा आफ्रिकी देशांना ‘रेड लिस्ट’मध्ये जोडून इथून येणाऱ्या उड्डाणांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात येत असल्याचं ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तसंच ब्रिटनला दाखल होणाऱ्या प्रवाशांना क्वारंटीन होणं अनिवार्य करण्यात आलंय.
दक्षिण आफ्रिकेत १०० हून अधिक संक्रमित रुग्ण
दक्षिण आफ्रिकेत करोनाच्या नव्या व्हेरियंटचे जवळपास १०० हून अधिक संक्रमित रुग्ण आढळले आहेत. हा नवा व्हेरियंट ‘चिंताजनक’ (Variant of Concern) असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नव्या व्हेरियंटची माहिती समोर येताच दक्षिण आफ्रिकेतल्या सरकारनं खासगी लॅबसोबत मिळून मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘द नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज’ (NICD) च्या म्हणण्यानुसार हा करोना स्ट्रेन अधिक संक्रमक असू शकतो.
भारतातही अलर्ट जारी
भारतातही आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतात दाखल होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची करोना चाचणी करण्याचे निर्देश आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. यासंबंधी त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सूचितही केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times