हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील जबलपूर हत्येच्या घटनेने हादरले
- दीराने केली वहिनीची हत्या, घटनेनंतर थेट पोलीस ठाण्यात हजर
- मोबाइलवर फोनवर बोलत असल्याचे केले धक्कादायक कृत्य
- पोलिसांनी दाखल केला गुन्हा, तपास सुरू
मध्य प्रदेशातील जबलपूर शहर हत्येच्या घटनेने हादरले. दीराने आपल्याच वहिनीची निर्घृण हत्या केली. मोबाइलवर ज्या व्यक्तीसोबत बोलत होती, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार देणाऱ्या वहिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात शस्त्र घेऊन हजर झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
जबलपूरमधील भंतलिया मोहल्ल्यात राहणारा आरोपी राजा चक्रवर्ती हा स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला, त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याचे हनुमंतल पोलिसांनी सांगितले. राजाने आपल्या भावाच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. ती मोबाइलवर कुणाशी तरी बोलत होती. ती कुणासोबत बोलतेय, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास तिने नकार दिला. याचा राग आल्याने राजाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले. महिला जमिनीवर पडली होती. तिच्या गळ्यावर जखमा होत्या. घटना घडली त्यावेळी तिचा पती, मुले आणि इतर कुटुंबातील सदस्य घरी नव्हते, असे सांगितले जाते. या घटनेचा तपास करण्यात येत आहे. आरोपीची चौकशीही करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times