हायलाइट्स:
- संविधान दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसद भवनात संबोधन
- काँग्रेससहीत इतर विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार
- ‘पंतप्रधानांकडून नाही तर लोकसभा सभापतींकडून कार्यक्रमाचं आयोजन’
या कार्यक्रमात उपस्थित संबोधित करताना, ‘देशात राजकारण देशहितावर वरचढ’ होत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील महात्मा गांधी आणि संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना नमन केलं. ‘आपला मार्ग योग्य आहे किंवा नाही याचं मूल्यांकन होऊ शकेल, यासाठीही संविधान दिवस साजरा करायला हवा. आपलं संविधान केवळ अनेक कलमांचा संग्रह नाही तर ही सहस्त्र वर्षांची महान परंपरा आहे. राष्ट्रहित सर्वात उच्चस्थानी ठेवलं गेल्यानंच संविधानाचं निर्माण होऊ शकलं’, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
‘घराणेशाही ही एक समस्या’
‘आज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एक समस्या आहे. घराणेशाहीत वावरणारे पक्ष देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. कौटुंबिक पक्ष याचा अर्थ असा नाही की एकाच कुटुंबातून अधिकाधिक लोकांनी राजकारणात येऊ नये… कौटुंबिक पक्ष म्हणजे असे पक्ष ज्यांचं नियंत्रण वर्षानुवर्ष, पीढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाशी संबंधित लोकांच्या हातात आहेत’, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं नाव न घेता हल्ला चढवला.
संविधान दिनाचा आजचा कार्यक्रम मोदी सरकारनं किंवा पंतप्रधानांनी आयोजित केला नव्हता तर हा कार्यक्रम लोकसभेच्या सभापतींनी आयोजित केला होता, असं म्हणत त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना निशाण्यावर घेतलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंतीहून आणखी पवित्र निमित्त काय असू शकेल. डॉ. आंबेडकरांनी देशाला जी महान भेट दिलीय त्याला आपण नेहमीच एक स्मृती ग्रंथ म्हणून स्मरणात ठेवतो. हा दिवस या सदनाला प्रणाम करण्याचा दिवस आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.
२६/११ दहशतवादी हल्ल्याचं स्मरण
यावेळी त्यांनी २००८ साली मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. ‘आज आपल्यासाठी दु:खद दिनही आहे. आजच्या दिवशीच देशाच्या शत्रुंनी मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. देशाच्या वीर जवानांनी दहशतवाद्यांशी दोन हात करत आपल्या जीवाचं बलिदान दिलं. आज मी त्या बलिदानकर्त्यांनाही नमन करतो’, असं म्हणत पंतप्रधानांनी २६/११ हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times