हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना
- १५ वर्षीय अल्पवयीन मातेने आपल्या ४० दिवसांच्या बाळाची केली हत्या
- १७ वर्षीय मुलाने बलात्कार केल्यानंतर पीडिता राहिली होती गरोदर
- हत्येच्या आरोपाखाली पीडितेविरोधात दाखल केला गुन्हा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्पवयीन मुलीचे गावातच राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. फेब्रुवारीत या मुलाने तिच्यावर अत्याचार केले. ऑगस्टमध्ये अचानक मुलीचे पोट दुखू लागले. तिने ही बाब घरातील सदस्यांना सांगितली. त्यानंतर या मुलीला डॉक्टरकडे नेण्यात आले. ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितले. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. मुलीनेही सर्व घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला. अल्पवयीन आरोपीविरोधात पॉक्सो अॅक्ट अंतर्गत कारवाई करून त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. ५ नोव्हेंबरला डॉक्टरांनी मुलीला आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून सोडले होते. त्यानंतर पाच दिवसांनी मुलगी एका स्थानिक आरोग्य केंद्रात गेली होती. आपलं बाळ आजारी असल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले होते.
डॉक्टरांनी बाळाला तपासले आणि त्याला मृत घोषित केले होते. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बाळाची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीने बाळाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. प्राथमिक चौकशीनंतर तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times