‘करोना’मुळे सध्या सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. हा नेमका आजार काय व त्यावर उपचार काय, याबाबत सर्वसामान्यांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच अरिहंत मॅट्रेसेस प्रायव्हेट लिमिटेडने एका वृत्तपत्रात अलिकडेच करोनाविरोधी गादी विक्रीला असल्याची जाहिरात दिली होती. ‘१५ हजार रुपये किमतीची ही गादी खरेदी केल्यास व त्यावर झोपल्यास करोना दूर होईल’, असा दावा त्या जाहिरातीत करण्यात आला. याविरुद्ध मुंबई ग्राहक पंचायतच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी भारतीय जाहिरात मानांकन परिषदेकडे (एएससीआय) तक्रार केली. त्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली.
कंपनीने ‘एएससीआय’च्या सरचिटणीसांशी संपर्क साधून जाहिरात मागे घेत असल्याचे सांगितले. तसेच अशी जाहिरात पुन्हा दिसल्यास निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन ‘एएससीआय’ने ग्राहक पंचायतीला केले आहे. ‘करोनाच्या साथीमुळे सर्वसामान्य भयभीत झाले आहेत. ग्राहकांची ही मानसिकता ओळखून स्वत:च उखळ पांढरे करण्याचा हा डाव होता. तो पंचायतीचे हाणून पाडला’, असे ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times