सोनाक्षी सिन्हा आणि सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सजदेह एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मीडिया रिपोर्टनुसार दोघांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते लग्न करणार आहेत. बंटी सजदेह हा सलमान खानचा नातेवाईक तर आहेच, पण तो त्याचा खूप चांगला मित्रही आहे. वास्तविक बंटी हा सोहेल खानचा मेहुणा आहे. तो सोहेल खानची पत्नी सीमा खानचा सख्खा भाऊ आहे.
एकंदरीत जर हे लग्न झाले तर सोनाक्षीचे खान कुटुंबाशी असलेलं नातं अधिक घट्ट होईल यात काही शंका नाही. दरम्यान, बंटी सजदेहचं यापूर्वी लग्न झालं असून त्याचा घटस्फोट झाला आहे. बंटी ‘कॉर्नर स्टोन’ या पीआर एजन्सीचा मालक आहे. ही तीच कंपनी आहे ज्यात दिशा सालियन काम करत होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक स्टार सेलिब्रिटी बंटीच्या कंपनीचे ग्राहक आहेत. बंटीची विराट कोहलीशीही घट्ट मैत्री आहे. सोनाक्षी आणि बंटीच्या लग्नात कलाकारच नाही तर क्रिकेटपटूही गाण्यावर ताल धरणार हे नक्की.
अफेअरवर सोनाक्षीने दिलेलं स्पष्टीकरण
सोनाक्षी सिन्हा ३४ वर्षांची आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दोघं नात्यात असल्याचं बोललं जात आहे. मात्र, यावर दोघांनी कधीच शिक्कामोर्तब केलं नाही. असं जरी असलं तरी दोघं अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. एका मुलाखतीत बंटीबद्दल विचारले असता सोनाक्षी म्हणाली होती की, ‘बंटी एक सेल्फ मेड मॅन आहे. तो सध्या त्याच्या बॅचलरहूडचा आनंद घेत आहे.’

चार वर्ष टिकलं लग्न, अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरच्या चर्चा
बंटी सजदेव याचं अंबिका चौहानसोबत २००९ मध्ये लग्न झालं होतं. दोघांनी गोव्यात धूमधडाक्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं, ज्यामध्ये सलमाननेही सरप्राईज एण्टी घेतली होती. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर बंटी आणि अंबिका यांचा घटस्फोट झाला. तसे पाहिलं गेलं तर, सोनाक्षी ही काही पहिली अभिनेत्री नाही जिचं नाव बंटी सजदेहशी जोडले गेले. याआधी या सेलिब्रिटी मॅनेजरचे नाव सुष्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि समीरा रेड्डीसोबतही जोडले गेले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times