हायलाइट्स:

  • शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यावरून गदारोळ
  • राजू शेट्टी यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा
  • शेतकऱ्यांना अवास्तव वीज बिले दिल्याचा केला आरोप

अहमदनगर : राज्यात सध्या वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्याची मोहीम सरकारकडून राबवण्यात येत आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Raju Shetti Against Maha Vikas Aghadi)

‘वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना जी वीज बिले पाठविली आहेत, ती सदोष आहेत. एकीकडे वीज बिल माफीचं आश्वासन द्यायचं आणि दुसरीकडे चुकीच्या तांत्रिक बाबींवर आधारित अवास्तव बिले पाठवायची, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी वीज बिल भरू शकत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. ‘अशा परिस्थितीत वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची कारवाई झाली, तर शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत,’ असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Omicron: करोनाच्या नव्या स्ट्रेनची धास्ती; राज्य सरकारची केंद्राला ‘ही’ विनंती

राजू शेट्टी जामखेड तालुक्यात आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. नगर जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या वसुलीचा प्रश्न गाजत आहे. अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडली आहे. या विरोधात शेतकऱ्यांची आंदोलनंही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शेट्टी म्हणाले, ‘वीज वितरण कंपनीतर्फे सध्या शेतकऱ्यांना जी बिले पाठविली आहेत, ती सदोष आहेत. चुकीच्या तांत्रिक पद्धतीने ती आकारली जात आहेत. बिले भरणाऱ्यांना पुढील वर्षी ५० टक्के माफीचं आश्वासन दिलं जात आहे, मात्र जर बिलेच चुकीच्या पद्धतीने आली तर ती शेतकरी भरणार कशी? बिले भरली जात नाहीत म्हणून वीज कंपनीतर्फे वीज तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. सध्या रबीचा हंगाम सुरू आहे. पिकांना पाणी देण्याची गरज आहे. चांगला पाऊस झाल्याने पाणीही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत वीज तोडली तर पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. म्हणून कंपनीने शेतकऱ्यांना वास्तव बिले द्यावेत. वसुलीसाठी ज्यांची वीज तोडली, ती पूर्वत करावी,’ अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

‘कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन नोंदी घेतल्या का?’

वीज बिलाच्या गोंधळासंबंधी शेट्टी म्हणाले की, ‘करोनाच्या काळात वीज कंपनीने बिले देणे थांबवलं होतं. मात्र, त्या काळातील सरासरी बिले काढून पाठवण्यात आली आहेत. यासंबंधी ऊर्जामंत्र्यांनी कितीही आश्वासने दिली, तरी पाळली जात नाहीत. शेतकऱ्यांना सध्या जी बिले आली आहेत, ती चुकीची आहेत. पाच अश्वशक्तीच्या वीज पंपाला साडेसात अश्वशक्तीप्रमाणे तर साडेसात अश्वश्कीतीच्या पंपाला दहा अश्वशक्तीच्या पंपाएवढे बिल पाठवण्यात आलं आहे. मुळात ही बिले काढताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन नोंदी घेतल्या का? त्या खऱ्या आहेत का? हाही प्रश्न आहे. अशी चुकीची बिले भरण्यास शेतकरी तयार नाहीत. तर दुसरीकडे वीज कंपनी लगेच कारवाईचा बडगा उगारत आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई योग्य ती मिळत नाही. उसाच्या एफआरपीचे पैसे एक रकमी मिळत नाहीत आणि वीज बिलाची वसुली मात्र सक्तीने केली जाते. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी काय करावे?’ असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here