हायलाइट्स:
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला काही ठिकाणी हिंसेचं गालबोट
- जळगाव जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक
- दगडफेक करणारा वाहक पोलिसांच्या ताब्यात
सोशल मीडियावरील पोस्ट वाचून भावनेच्या भरात हे कृत्य घडल्याचं वाहक उमेश आवटी याने सांगितलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव आगाराची पहिली बस आज जामनेर येथे रवाना झालेली होती. जामनेर येथून दुपारी २ वाजता परतीचा प्रवास करत असताना नेरीजवळील गाडेगाव घाटात एका आयशर ट्रकच्या मागे उमेश आवटी नावाचा जामनेर आगाराचा वाहक लपून बसला होता. बस समोर येताच त्याने बसच्या काचेवर दगड भिरकावला.
दगडफेकीनंतर एसटी बसचालक सोपान सपकाळे यांनी प्रसंगावधान राखून जागीच वळण घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. याप्रसंगी बसमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलीस तसंच जळगाव आगारातील वाहक गोपाळ पाटील यांनी संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो एका शेतात आढळून आला. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस ठाण्यात जामनेर आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times