खासगी कंपन्यांना ५० टक्के अट बंधनकारक
खासगी कंपन्याच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आढळल्यास संबंधित कंपनीवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारपासून पालिकेचे पथक विविध भागातील खासगी कंपन्यांच्या कार्यालयात पाहणी करून याबाबतची माहिती पोलिसांना देणार आहे.
रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपये दंड
पान आणि गुटखा खाऊन रस्त्यावर पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे पालिकेने ठरवले असून, तब्बल एक हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. थुंकीतून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी हा निर्णय पालिकेने घेतला आहे. पूर्वी रस्त्यावर थुंकल्यास दोनशे रुपये दंड होता. आता त्यात पाचपटीने वाढ करण्यात आली आहे.
दुकानेही एक दिवसाआड बंद
सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गर्दीची ठिकाणे, बाजार परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एखाद्या परिसरात आज दुकाने बंद असली तर दुसऱ्या दिवशी या परिसराच्या पुढच्या भागातील दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. याबाबतच्या सूचना पालिका प्रशासनाने सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.
…तरीही अनेक जण कामावर
गर्दी कमी व्हावी म्हणून राज्य सरकार तसेच पालिका काही उपाययोजना करत आहे. खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे (वर्क फ्रॉम होम) यादृष्टीने मंगळवारी सरकारने खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी शक्यतो घरून काम करावे, अशी सूचना सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यास कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. बुधवारी मात्र या बहुसंख्य कर्मचारी कामावर आल्याची दिसून आले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times