हायलाइट्स:
- २४ वर्षीय तरुणीला त्रास दिल्याप्रकरणी तरूणाला अटक
- फोनवर पाठवले अश्लील मेसेज आणि व्हिडिओ
- मुंबईतील तरूणीने पोलिसांत दाखल केली तक्रार
- टेक्निकल सर्व्हिलान्सच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला केली अटक
मुंबई सेंट्रल जीआरपीने ही कारवाई केली. कामगार असलेल्या मिलन यादवला त्यांनी शुक्रवारी अटक केली. २४ वर्षीय तरूणीला मोबाइवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पीडित तरुणी ही दक्षिण मुंबईत राहते. ती ५ नोव्हेंबरला आपल्या कुटुंबीयांसोबत राजस्थानमधील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी निघाली होती. दादर टर्मिनस येथे ट्रेनची वाट बघत असताना सकाळी ११. ५० वाजता तरुणीला फोन कॉल आला. अनोळखी क्रमांकावरून हा कॉल आला होता. तो उचलल्यानंतर समोरील व्यक्तीने तिला व्हॉट्सअॅप मेसेज बघण्यास सांगितले. त्यावर तरूणीने आपण कोण बोलता अशी विचारणा केली. मात्र, समोरील व्यक्तीने लगेच फोन ठेवला.
तक्रारदार तरूणीने तिचा फोन चेक केला असता, तिला धक्काच बसला. व्हॉट्सअॅपवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आले होते. ती पुन्हा माघारी निघाली होती. पण तिच्यासोबत कुटुंबीय असल्याचे ती गप्प राहिली. त्यानंतर आरोपीने तिला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. मात्र, तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी तरूणीला पुन्हा मोबाइलवर मेसेज आला. त्यावर तरूणीने त्याला उत्तर दिले. पुन्हा अशा प्रकारचे मेसेज पाठवल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आरोपीने तिला मेसेज पाठवणे बंद केले. तरूणी राजस्थानमधून मुंबईत परतल्यानंतर तिने व्हीपी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्य रेल्वे पोलिसांकडे ती तक्रार वर्ग केली. टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. शुक्रवारी पोलिसांनी वसईतून यादव याला अटक केली.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, तरूणीला आपण ओळखत नसून, असाच अनोळखी नंबर डायल केला होता. त्याने सर्व मेसेज आणि व्हिडिओ फोनमधून डिलिट केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्याचा फोन ताब्यात घेतला असून, त्याने आणखी काही महिलांना अशा प्रकारचे मेसेज आणि व्हिडिओ पाठवले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times