हायलाइट्स:

  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा
  • जिल्हा बँक निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोप
  • आघाडी धर्म पाळला गेल्या नसल्याचा दोन्ही पक्षांतील नेत्यांचा दावा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी शेलक्या शब्दात काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली आहे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देताना, जिल्ह्यात खरे विश्वासघातकी कोण आहे, ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, असं कॉंग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. (काँग्रेस Vs Ncp ताज्या बातम्या)

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत जतमधून काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा आणि पतसंस्था गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लाड यांचा पराभव झाला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले.

Uddhav Thackeray: ओमिक्रॉनचा धोका; मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, लॉकडाऊनबाबत म्हणाले…

महाविकास आघाडीच्या पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकल्या. मात्र काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत आणि राष्ट्रवादीचे किरण लाड यांच्या पराभवामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना कुजके, नासके, घातकी आणि चालबाज राजकारणामुळे आघाडीचे उमेदवार किरण लाड यांचा पराभव झाल्याचा आरोप थेट काँग्रेसवर केला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात लाड कुटुंबाचं वर्चस्व वाढेल, या भीतीपोटी मित्रपक्षांनी भाजपच्या उमेदवारास मदत केल्याचा आरोप आमदार अरुण लाड यांनी केला आहे.

आमदार अरुण लाड यांच्या आरोपानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत पराभूत झालेले उमेदवार आमदार विक्रम सावंत यांनीही राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जिल्ह्यात काँग्रेसने नेहमीच आघाडी धर्म पाळला आहे, पण मित्रापक्षाकडून आघाडी धर्म पाळला जात नाही. जिल्ह्याच्या राजकारणात खरे विश्वासघातकी कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढवण्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असा आग्रह वरिष्ठांकडे धरणार असल्याची माहिती आमदार सावंत यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील कुरघोडीचं राजकारण समोर आलं आहे. या राजकारणाचे परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here