नवी दिल्ली : साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना शुक्रवारी पहाटे फासावर चढवण्यात येणार आहे. पहाटे साडे पाच वाजता तिहार तुरुंगात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वीच गुरुवारी रात्री उशिरा ही फाशी रोखण्यासाठी या दोषींनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर एक याचिक दाखल केलीय. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती संजय नरुला यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. या दरम्यान निर्भयाचे कुटुंबीयदेखील न्यायालयात हजर आहेत.

अक्षय सिंह याच्या पत्नीनं दाखल केलेली घटस्फोट याचिका प्रासंगिक नसल्याचं अगोदरच सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्याचंही दिल्ली उच्च न्यायालयानं नमूद केलं. तसंच ‘न्यायपालिकेसोबत हा खेळ खेळला जात’ असल्याचंही न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान म्हटलं. यानंतर वकील ए पी सिह यांनी निर्भयाच्या दोषींची फाशी टाळण्यासाठी कोर्टासमोर त्यांच्या गरिबीचाही हवाला दिला.

यावेळी, सुनावणी दरम्यान ‘गुरुवारी एकाच दिवशी तुम्ही तीन न्यायालयांसमोर गेला आहात. आज रात्री १० वाजता आम्ही तुम्हाला ऐकत आहोत, त्यामुळे गोष्टी हाताबाहेर आहेत, असं तुम्ही म्हणू शकत नाहीत’ असं दिल्ली उच्च न्यायालयानं दोषींच्या वकिलांना सुनावलं.

तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर एक याचिका प्रलंबित आहे. यासोबत अजूनही काही याचिका प्रलंबित असताना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी होऊ शकते, असं दोषींचे वकील ए पी सिंह यांनी न्यायालयासमोर म्हटलं.

शुक्रवारी या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली एकाच वेळी चार आरोपींना ठोठावली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. परंतु, सगळे पर्याय संपल्यानंतरही फाशी टाळण्यासाठी दोषींच्या वकिलांचे प्रयत्न सुरूच आहेत.

दरम्यान, तिहार तुरुंगात दोषींना फाशी देण्यासाठी पवन नावाच्या जल्लादाला पाचारण करण्यात आले असून, त्याला प्रत्येक फाशीसाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत. तिहारच्या तुरुंग क्रमांक तीनमध्ये गुरुवारी सकाळी फासावर चढविण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. फाशीसाठी वापरले जाणारे दोर बिहारच्या बक्सरमधून मागवण्यात आले आहेत.

दोषींना फाशी देण्याचा ५ मार्च रोजी चौथा मृत्यु वारंट काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. चालू वर्षात २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेले मृत्यूचे वॉरंट कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here