omicron variant update: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरूण करोना पॉझिटिव्ह; आता आली महत्वाची अपडेट – omicron variant update news now dombivli passengers families will be covid 19 test today
मुंबई: करोनाचा नवीन आणि आतापर्यंतचा सर्वात घातक व्हेरियंट ‘ओमिक्रॉन‘मुळे देशभरात धास्ती वाढली असतानाच, देशात आणि राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून दिल्ली- मुंबई आणि नंतर डोंबिवलीत आलेल्या तरुणाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरूण दक्षिण आफ्रिकेतून दिल्लीत आल्यानंतर मुंबईत पोहोचला. सध्या या तरूणाचे नमुने जिनोम सीक्वेंसिंगसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या तरूणाला करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकते. दरम्यान, त्या रुग्णाच्या कुटुंबातील सहा जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील एकाचा अहवाल येणं बाकी आहे, तर बाकी इतर जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच बाहेरून आलेल्या त्या रुग्णाचा अहवाल येत्या आठवडाभरात मिळेल, अशी माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
दरम्यान, करोना विषाणूच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या वाढच्या संसर्गामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने १२ देशांची एक यादी जारी केली आहे. या यादीत ज्या देशांची नावे आहेत, त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. सरकारने दक्षिण आफ्रिका, चीन, न्यूझीलंड आणि हाँगकाँग या देशांसाठी नियम कठोर केले आहेत.
चार देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना
सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, दक्षिण आफ्रिका, चीन, न्यूझीलंड आणि हाँगकाँग या देशांतून येणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम आपल्याकडील लसीकरण प्रमाणपत्र दाखवावा लागेल. त्यांनतर प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होईल. तपासणी अहवाल आल्यानंतर सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा चाचणी करावी लागेल.