विजयसिंह होलम. करोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या नैसर्गिक संकटांमुळे भल्या भल्यांसमोर आर्थिक अडचणी आल्या. याचा फटका दिव्यांगांनाही बसलाच. मात्र, हार न मानता येथील अनाम प्रेम संस्थेने दिव्यांगांसाठी चप्पल उद्योग सुरू करण्यास चालना दिली. त्यातून तब्बल ३० प्रकारच्या चपलांच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. ‘साथी’ या नावाने बाजारात आणलेली दिव्यांग निर्मित ही चप्पल त्यांना स्वत:च्या पायावर उभी करणारीही ठरत आहे.

जागतिक संकटामुळे दिव्यांगांच्या अडचणीत भरच पडली. अशा काळात त्यांना सावरण्यासाठी नगरच्या ‘अनाम प्रेम’ संस्थेने पुढाकार घेतला. दिव्यांगांना स्वयंपूर्ण करण्यासाठी काय पूरक उद्योग करता येईल, याचा शोध सुरू होता. त्यातूनच चप्पल निर्मितीची संकल्पना पुढे आली. नगरमधील उद्योजक अविनाश बोपर्डीकर यांनी यासाठी हातभार लावला. सुमारे तीन लाख रुपयांची यंत्रणा त्यांनी देणगी स्वरूपात दिली. इच्छुक दिव्यांगांना प्रशिक्षण देण्यात आले. कामाला सुरुवात झाली. गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीस वेगवेगळ्या प्रकारच्या आणि उत्तम दर्जाच्या चपलांची निर्मिती करण्यात आली. ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या सत्यमेव जयते ग्राम, रवीनंदा संकुलातील कौशल्य विकास प्रकल्पात हा चप्पल उद्योग सुरू झाला. पुण्यातील ‘अनाम प्रेम’च्या कार्यकर्त्या दीप्ती सोंदे यांनी या उद्योगाला ‘साथी चप्पल’ हे नाव सुचविले. याच नावाने चपला बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत. दिव्यांग आणि समाज यांनी एक साथ येऊन दिव्यांगांच्या पुनर्वसनाचा संकल्प केला तर अनेक दिव्यांग स्वयंपूर्ण होऊ शकतात हा हे नाव देण्यामागील उद्देश आहे. अनामप्रेमचे कार्यकर्ते विक्रम प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक प्रजापती, रवी कंठाळे, अनिकेत कांबळे, प्रतिभा जगताप यांनी चपला तयार केल्या.

वाचा:

आता त्यांची विक्री व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. बाजारभावाप्रमाणेच चपलांची किंमत ठेवण्यात आली आहे. पहिले विक्री केंद्र नगरच्या गांधी मैदान येथील संस्थेत सुरू झाले. आता ग्रामीण भागातही उत्पादन आणि विक्रीचे नेटवर्क उभारण्यात येणार आहे. येत्या काही काळात सुमारे शंभर दिव्यांगाना या उद्योगात स्वयंपूर्ण बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे, अशी माहिती अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने यांनी दिली. उद्योजक अभय रायकवाड, उद्योजक मिलिंद कुलकर्णी, उद्योजक राजीव गुजर, स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे, अजित कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पहिल्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here