हायलाइट्स:
- ओमिक्रॉनची ‘अधिक धोकादायक’ व्हेरियंट म्हणून नोंद
- जागतिक आरोग्य संघटनेकडून धोका जाहीर
- रुग्णसंख्या वाढली तर गंभीर परिणामाचा धोका
जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या ‘टेक्निकल नोट’मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. ओमिक्रोनच्या रुग्णांत एकाएकी अधिक वाढ झाली तर याचे अधिक गंभीर परिणाम समोर येऊ शकतात. उल्लेखनीय म्हणजे, अद्याप ‘ओमिक्रॉन’च्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.
जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोविड विषाणूचा एका नवा स्ट्रेन / व्हेरियंट B.1.1.529 हा विषाणू सर्वात अगोदर दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. करोनाच्या या व्हेरियंटचं नामकरण ‘ओमिक्रॉन’ असं करण्यात आलंय. या व्हेरियंटला कोविडच्या इतर व्हेरियंटहून (अल्फा, बीटा, गामा) अधिक चिंताजनक श्रेणीत (Most Troubling Category) ठेवण्यात आलंय.
या देशांत आढळून आला ‘ओमिक्रॉन’
दरम्यान, ओमिक्रॉनमुळे जगभरात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ‘ओमिक्रॉन’चे जवळपास १६० रुग्ण आढळून आले आहेत. युरोपच्या अनेक देशांत ओमिक्रॉनचं अस्तित्व दिसून आलंय. आरोग्य मंत्रालयाच्या उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बोत्सवाना, यूके, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, इस्रायल, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, इटली, जर्मनी आणि हाँगकाँग या देशांत ‘ओमिक्रॉन’ आढळून आला आहे.
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे सर्वाधिक ९९ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर हाँगकाँगमध्ये २५, नेदरलँडमध्ये १३, बोत्सवानामध्ये सहा आणि ब्रिटनमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि बेल्जियममध्ये प्रत्येकी दोन तर इस्रायल, झेक प्रजासत्ताक, इटली आणि जर्मनीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सध्या भारतात ‘ओमिक्रॉन’बाधित एकही रुग्ण समोर आलेला नाही.
ओमिक्रॉनच्या फैलावापासून वाचण्यासाठी अनेक देशांनी सावधानतेचा उपाय म्हणून उड्डाणांवर बंदी सारखे अपाय अंमलात आणले आहेत. या व्हेरियंटच्या फैलावाच्या बातमीनंतर स्टॉक मार्केट तेजीनं खाली घसरलेला दिसून येतोय.