हायलाइट्स:
- इटलीच्या बेबी जिजस पेडियाट्रिक हॉस्पीटलकडून ओमिक्रॉनचे फोटो जाहीर
- ‘ओमिक्रॉन’नं मूळ करोना व्हेरियंटहून अत्यंत वेगळं रुप धारण केल्याचं समोर
- आतापर्यंत एकाही ‘ओमिक्रॉन’ बाधित रुग्णाचा मृत्यू नाही
‘ओमिक्रॉन’ हा अधिक संक्रामक असल्याचं समोर आलंय. मात्र, हा किती घातक ठरू शकतो, याचा अभ्यास तज्ज्ञ अद्याप करत आहेत.
बेबी जीसस पेडियाट्रिक हॉस्पिटल (अर्भक येशू मुलांचे रुग्णालय) द्वारे ओमिक्रॉनचे हे फोटो जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डाव्या बाजुला डेल्टा व्हेरियंटचे ‘स्पाईक प्रोटीन’ दिसून येत आहेत तर उजव्या बाजुला ‘ओमिक्रॉन’चे… तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनचे अधिक म्युटेशन्स त्याच ठिकाणी आहेत जे व्यक्तीच्या पेशींच्या संपर्कात येतात.
फोटोत दिसणारे लाल रंगाचे ठिपके करोना व्हेरियंटमध्ये झालेले बदल दर्शवतात. तर करड्या रंगात मात्र विषाणू आपल्या जुन्याच रुपात असल्याचं दिसून येतंय. नवीन व्हेरियंट कमी धोकादायक आहे किंवा नाही हे अधिक अभ्यासानंतरच समजू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोविड विषाणूचा एका नवा स्ट्रेन / व्हेरियंट B.1.1.529 हा विषाणू सर्वात अगोदर दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. करोनाच्या या व्हेरियंटचं नामकरण ‘ओमिक्रॉन’ असं करण्यात आलंय. या व्हेरियंटला कोविडच्या इतर व्हेरियंटहून (अल्फा, बीटा, गामा) अधिक चिंताजनक श्रेणीत (Most Troubling Category) ठेवण्यात आलंय.