मुंबई: करोनाचे राज्यात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची स्ख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये आठ रुग्ण मुंबई येथील तर, दोन जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी एक रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले आहेत. संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री यांनी आज सांगितले.

मुंबईत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे; तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून, आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा, पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोनाबाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

पाळीव प्राणी सोडून देऊ नका!

राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
करोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील:

पिंपरी चिंचवड महापालिका – १२
पुणे महापालिका – ११ ( २१ मार्च रोजी दोन रुग्ण आढळले)
मुंबई- १९ ( २१ मार्च रोजी आठ रुग्ण आढळले)
नागपूर- ४
यवतमाळ, कल्याण प्रत्येकी – ४ ( २१ मार्च रोजी प्रत्येकी एक रुग्ण)
नवी मुंबई – ३
अहमदनगर – २
पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी – प्रत्येकी १

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here