हायलाइट्स:
- कल्याण-डोंबिवलीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांना अटक
- महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याणमध्ये दाखल होता गुन्हा
- उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत, पीडितेने कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli News) महापालिकेतील भाजपचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी आणि सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप या महिलेने केला होता. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणात महिलेने दाखल केलेली तक्रार नोंदवून गायकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर गायकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उच्च न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर काल रात्री संदीप गायकर स्वतः कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तिथे बाजारपेठ पोलिसांनी गायकर यांना अटक केली. दोन महिन्यांपासून गायकर फरार होते. अटक केल्यानंतर गायकर यांना पोलीस बंदोबस्तामध्ये कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गायकर यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
याबाबत पीडित महिलेचे वकील क्रांती रोठे यांनी माहिती दिली. आरोपी संदीप गायकर हा काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. आज, मंगळवारी कल्याण न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. गायकर याने गंभीर गुन्हे केले आहेत. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने बाजू ऐकून घेऊन आरोपीला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे अॅड. रोठे यांनी सांगितले.