जळगाव : शहरात भाजपला शह देत काही आठवड्यांपूर्वी शिवसेनेनं सत्ता काबीज केली आणि पालिकेत सेनेचा महापौर निवडून आला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेविरोधात आता भाजप आक्रमक झाली असून विविध मुद्द्यांवरून सेनेला घेरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेने (जळगाव मनपा) घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात मंगळवारी भाजप महानगरच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसंच मागण्यांचं निवदेन महापालिका आयुक्तांना देण्यात आलं आहे.
महापालिकेचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी करत भाजपकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला
दरम्यान, ‘महापालिकेकडून नुकतीच घरपट्टीत वाढ करण्यात आली. त्याबदल्यात वीज, रस्ते या मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नाहीत. अशातच अंदाधुंद पद्धतीने घरपट्टी वाढवण्यात आली आहे. वाढीव घरपट्टी रद्द न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा यावेळी भाजप पदाधिकार्यांनी दिला आहे.