हायलाइट्स:
- नव्या करोना व्हेरिएंटमुळे निर्माण झाला धोका
- सरकारच्या निर्देशानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वाचा निर्णय
- जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली माहिती
या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकातून येणाऱ्या सर्व मार्गावर प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिल्या?
केंद्र सरकारने निर्देश केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात परदेशातील अथवा परराज्यातील नागरिकांना प्रवेश देताना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. ज्या व्यक्तींनी करोना लशीचे दोन डोस घेतले आहेत आणि १४ दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसंच ७२ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल त्या व्यक्तीला जवळ बाळगावा लागणार आहे. १८ वर्षाखालील मुले आणि मुलींना त्यांच्या वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. त्यासाठी आधार कार्ड अथवा जन्माचा दाखला दाखवणे बंधनकारक राहणार आहे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांनी डोस घेऊ नये असं सांगितलं असेल त्या व्यक्तींना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करताना अधिकृत डॉक्टरांचा आरोग्य विषयक पुरावा दाखवणे बंधनकारक राहणार आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जे काटेकोर नियम होते ते पाळणे बंधनकारक राहणार आहे. नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट हा अत्यंत घातक असल्याने नागरिकांनी एन नाइन्टी फायव्ह मास्क, तीन पदरी मास्क, सर्जिकल लेअर मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. तोंडाला रुमाल बांधणे, कापडी मास्क वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियमावलीतही बदल करण्यात आली असून बंदिस्त हॉलमध्ये ५० टक्के आसनक्षमता अथवा फक्त १०० नागरिकांना करोना प्रतिबंधक नियम वापरणाऱ्या प्रवेश देण्यात येणार आहे. खुल्या जागेमधील कार्यक्रमात फक्त २५ टक्के म्हणजे २०० जणांना प्रवेश देण्याचं बंधनकारक केलं आहे. नियम मोडणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
दरम्यान, करोनाच्या येणाऱ्या संकटाला नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली. नागरिकांनी करोनासंबधीच्या सर्व नियमांचे पालन करावे. हात धुणे, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी नो मास्क, नो व्हॅक्सिनेशन, नो एंट्रीचे फलक लावावेत. त्यासाठी नागरिकांनी मोबाईलवर दोन डोस पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करुन घ्यावे अथवा सर्टिफिकेटची प्रिंट कॉपी जवळ बाळगावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.