हायलाइट्स:
- ४९ वर्षीय व्यक्तीकडून १० हजार रुपयांची लाच
- दिव्यांग प्रमाणपत्र ४० टक्क्यांपेक्षा जास्त करुन देण्यासाठी मागितली लाच
- दोन आरोपींना अटक
पारोळा तालुक्यातील ४९ वर्षीय तक्रादार व्यक्ती एका हाताने दिव्यांग आहे. या हाताचे दिव्यांगत्व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दाखवतो, असं संशयित अनिल तुकाराम पाटील (वय ४९, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) व विजय रुपचंद लढे (वय ६७, रा. मारवाडी गल्ली, नगरदेवळा, ता. पाचोरा) यांनी तक्रारदाराला सांगितलं होतं. यासाठी त्यांनी १० हजार रुपयांची लाचही मागितली. दिव्यांग व्यक्तीस लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली.
तक्रारीनुसार मंगळवारी चोपड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्ती लाचेची रक्कम घेऊन पोहोचले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहात अटक केली.
दरम्यान, या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.