संगमनेर: करोनाबाबत व्यापक जनजागृती केली जात असून इंदोरीकर महाराजही या मोहिमेत आज उतरले. त्यांनी आपल्या समर्थकांना कळकळीचे आवाहन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना संदर्भात जे आवाहन केले आहे त्यास सर्वांनी सहकार्य करा. आपलं गाव, आपलं शहर, आपला देश या संकटातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून हा सर्वांचा लढा आहे, असे नमूद करत मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे आवाहन ह.भ.प. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे चाहत्यांना केले.

इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात ६३ जणांना करोना सारख्या आजाराने बाधित केलेले आहे. त्यामुळे आपले गाव, आपले शहर, आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे व ती अत्यंत गरजेची बाब आहे. हा कोण्या एकट्या दुकट्या व निव्वळ शासन, प्रशासनाचा नाही तर सर्वांचा लढा आहे. तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन इंदोरीकरांनी केले.

स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला करोना विषाणूपासून दूर ठेवा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या व शासनाला सहकार्य करा. मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे इंदोरकर महाराज यांनी पुढे नमूद केले आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराज यांनी ३१ मार्चपर्यंत कीर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here