सोयाबीन विकून मिळालेले १ लाख चोरीला, घरी जाताना शेतकऱ्यासोबत घडला भयंकर प्रकार – hingoli news rs 1 lakh was snatched from the trunk of a farmers two wheeler
हिंगोली : वसमतमध्ये भरदिवसा धावत्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून १ लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. ३० दुपारी घडली आहे. वसमत शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी माणिकराव बाबाराव नवघरे यांनी काही दिवसांपुर्वीच सोयाबीन विक्री केले होते. त्याचे पैसे आड दुकानदारांनी त्यांच्या खात्यावर आसेगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेत आरटीजीएस द्वारे रक्कम जमा केली होती. त्यानंतर आज दुपारी ते बँकेत एक लाख रुपये काढण्यासाठी दुचाकी वाहनावर गेले होते. बँकेतून पैसे काढल्यानंतर ते गावाकडे निघाले. मात्र वसमत शहर पोलीस स्टेशन समोरील महावीर चौकामध्ये गर्दी असल्यामुळे नवघरे यांनी त्यांचे दुचाकी वाहन हळू केले. या संधीचा गैरफायदा घेत एका चोरट्याने दुचाकीचा पाठलाग करून धावत्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून १ लाख रुपये काढून पळ काढला. ओमिक्रॉनचा धोका! औरंगाबादेत नवीन निर्बंध, वाचा काय आहेत नियम? दरम्यान, तेथून काही अंतरावर एका दुकानासमोर आल्यानंतर डिक्कीतील पैसे पळविल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वसमत शहर पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास खार्डे यांच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली. यामध्ये एक चोरटा दुचाकीच्या मागे पळून डिक्कीतील पैसे काढत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणी सायंकाळी उशीरा पर्यंत वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.