हायलाइट्स:
- सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये संघर्ष
- नगरसेवकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न
- नगरसेवक आणि पोलिसांमध्येही जोरदार झटापट
मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी विषयपत्रिकेत नसलेल्या विषयावर मत मांडणार नसल्याचं सांगताच आक्रमक झालेल्या विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांच्या व्यासपीठासमोर जाऊन घोषणाबाजी केली. तसंच मुख्याधिकारी केबिनसमोर धरणे आंदोलन करणार्या विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेवक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. याबाबत इस्लामपूर पोलिसांनी सहा नगरसेवकांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत २२ मार्च २०२१ ला तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. सभेच्या प्रारंभीच विक्रम पाटील यांनी शहरातील भुयारी गटर योजनेच्या थांबलेल्या कामावरून प्रश्न उपस्थित केले. २० नोव्हेंबरपर्यंत यावर निर्णय देण्याचं आश्वासन देऊनही मुख्याधिकाऱ्यांनी ते न पाळल्याबाबत संताप व्यक्त केला. भुयारी गटर कामात राष्ट्रवादी अडथळा आणत असल्याचा आरोप यावेळी झाला.
राष्ट्रवादीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तर या योजनेला राष्ट्रवादीने सातत्याने सहकार्यच केल्याची भूमिका चिमन डांगे यांनी मांडली. अमित ओसवाल आणि खंडेराव जाधव, तर शहाजी पाटील आणि विक्रम पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला.
मुख्याधिकारी आपली दखल घेत नसल्याचा आरप करीत विक्रम पाटील यांनी अचानक आत्मदहन करण्याचा पावित्रा घेतला. त्याला अमित ओसवाल, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदिप लोहार, चेतन शिंदे यांनी साथ दिली. सर्वांनी नगरपालिका सभागृहातून बाहेर पडून मुख्याधिकारी केबिनकडे धाव घेत ठिय्या मारला. मुख्याधिकार्यांच्या केबिन बाहेर ठिय्या मारून विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेत पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी आंदोलकांकडून डिझेलचे चार कॅन काढून घेतले.
दरम्यान, नगरपालिकेत दोन्ही गट आमने-सामने भिडल्याची माहिती मिळताच समर्थकांनी नगरपालिकेबाहेर गर्दी केली. सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आंदोलनासाठी बसलेल्या नगरसेवकांनी दुसर्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.