हायलाइट्स:

  • राजेंद्र पाटील यड्रावकरांना आव्हान
  • दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी थोपटले दंड
  • माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलं बळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिरोळ सेवा संस्था गटात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांना शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी आव्हान दिलं आहे. गणपतराव पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (राजू शेट्टी ताज्या बातम्या अपडेट) यांनी बळ दिलं असून जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने यड्रावकरांना रोखण्यासाठी शेट्टी आणि पाटील यांची गट्टी जमली आहे.

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेते मंडळींनी जोरदार प्रयत्न सुरू केले असले तरी शिरोळ तालुका सेवा संस्था गटात बँकेचे विद्यमान संचालक मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दत्त शिरोळ साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी याच गटात उमेदवारी अर्ज दाखल करुन जोरदार आव्हान दिले आहे. या गटात राजू शेट्टी यांनी अर्ज भरला असला तरी तरी गणपतराव पाटील यांच्यासाठी ते माघार घेणार आहेत.

Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; ‘या’ २ राज्यांनी उचलली कठोर पावले

पाटील आणि शेट्टी यांनी शक्तीप्रदर्शन करत आज बुधवारी अर्ज भरले. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, बँकेच्या राजकारणात सर्व नेते आपापल्या गटात निवडणूक बिनविरोध करत आहेत. मग शिरोळ गटातील निवडणूक बिनविरोध का होत नाही. या गटात गणपतराव पाटील यांची बिनविरोध निवड करावी, अन्यथा आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिरोळ सेवा संस्था गटातील निवडणूक काटाजोड होण्याचे संकेत मिळत आहेत. मंत्री यड्रावकर यांच्याविरोधात तालुक्यातील सर्व गट एकत्र झाले असल्याने या गटात १०० टक्के निवडणूक लागणार असं दोन्ही गटाचे नेते छातीठोकपणे सांगत आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात चंदगडचे आमदार राजेश पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, त्यांचे चिरंजीव माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार सत्यजीत पाटील, उल्हास पाटील, बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, त्यांच्या पत्नी ज्योती पाटील, विजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव नंदनवाडे, डॉ. अशोक माने यांनी अर्ज भरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here