अरबी समुद्रामध्ये असलेली चक्रीय वातप्रणाली आणि कच्छपर्यंत निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली. याचा प्रभाव उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अधिक होता. पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला होता. तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. यासोबतच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत झालेल्या नोंदीनुसार माथेरामध्ये २० मिलीमीटर, नाशिकमध्ये १९ मिलीमीटर, अलिबागमध्ये २१ मिलीमीटर, डहाणूमध्ये ११.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुण्यातही दिवसभर पावसाचा जोर होता. थांबूनथांबून सरी कोसळत होत्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत ३३.८ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. अनेक वर्षांनंतर पुणेकरांना बुधवारी पाऊस, थंडी आणि धुके असा तिहेरी योग अनुभवता आला.
पावसामुळे वैजापूर गारठले
वैजापूर, शहर व ग्रामीण भागात बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मागील दोन दिवसांपासुन थंडीचे प्रमाण वाढले असुन नागरिक थंडीचा अनुभव करत आहेत. बुधवारी वैजापूर शहराचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे.