हायलाइट्स:
- ‘नेचर जर्नल’मध्ये संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध
- दक्षिण चिलीतील पॅटागोनिया प्रांतातील मॅगलानेस प्रांतात आढळला डायनासोरचा सांगाडा
- ‘स्टेगौरोस एलेनगासेन’कडे आढळून आलं वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक हत्यार
लॅटिन अमेरिकन देश असलेल्या चिलीमध्ये डायनासोरचा एक सांगाडा अभ्यासकांच्या हाती लागलाय. अजब म्हणजे, हा डायनासोर आपल्या शेपटीचा वापर एखाद्या शक्तीशाली आणि घातक हत्याराप्रमाणे करत असल्याचं समोर येतंय. आतापर्यंत समोर आलेल्या एकाही डायनासोरमध्ये अशा प्रकारची शेपटी आढळून आली नव्हती.
चिलीत सापडला डायनासोरचा सांगडा
चिलीमध्ये सापडलेल्या या डायनासोरच्या सांगाड्यावरून हा तब्बल ६.५ फूट लांब होता असं दिसून येतंय. ‘क्रेटेशियस’ काळातील हा लहान पण सशस्त्र डायनासोर ७१ ते ७४ दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचा कयास लावला जातोय. या डायनासोरचा संपूर्ण सांगाडा दक्षिण चिलीतील पॅटागोनिया प्रांतातील मॅगलानेस प्रांतात सापडला आहे.
नुकतंच, ‘नेचर जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आलाय. या डायनासोरचं नाव ‘स्टेगौरोस एलेनगासेन’ ( Stegouros Elengassen) असं आहे. एखाद्या हत्याराप्रमाणे या डायनासोरची शेपटी विकसित झाल्याचं समोर येतंय. हेच या डायनासोरचं वैशिष्ट्यं ठरलंय.
शेपटीत सात हाडे
‘स्टेगौरोस एलेनगासेन’ या डायनासोरच्या शेपटीत सात चपटी हाडे सापडली आहेत. ही हाडे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. ही शेपटी एखाद्या पानाच्या आकाराची दिसेत. ही शेपटी आश्चर्यच असल्याचं या संशोधनाचे प्रमुख लेखक सर्जिओ सोटो यांनी म्हटलंय.
सर्जिओ सोटो यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत दिसणाऱ्या रॅटलस्नेकच्या शेपटाप्रमाणे किंवा काटेरी शेपटी असलेला सरड्याप्रमाणे या डायनासोरच्या शेपटीचा आकार दिसतो. या प्राण्यांच्या अगदी विरुद्ध पद्धतीनं डायनासोरची हाडं मजबूत असल्याचं आढळून येतं.
अमेरिका खंडात सापडणाऱ्या आर्माडिलोसारखी या डायनासोरच्या शेपटीचा आकार असलेला दिसून येतो. उल्लेखनीय म्हणजे, आर्माडिलो ही प्रजातीदेखील आता नामशेष झालीय. ग्रीक भाषेत ‘स्टेगौरोस’ या शब्दाचा अर्थ ‘उंच शेपूट’ असा होतो.
वैशिष्ट्यपूर्ण आकार
‘स्टेगौरोस एलेनगासेन’ डायनासोरचे जीवाश्म २०१८ साली हाती लागले होते. असे डायनासोर ७० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उत्तरेकडील भागात अधिक आढळत होते, परंतु तत्कालीन दक्षिण गोंडवाना परिसरात ते सापडणं ही दुर्मिळ घटना मानली जातेय. उत्तर गोलार्धात आढळणाऱ्या डायनासोरहून या नवीन प्रजातीच्या डायनासोरकडे शेपटीसारखं हलकं हत्यार, सडपातळ पाय आणि लहान आकार असा वैशिष्ट्यपूर्ण आकार होता. या डायनासोरच्या काळात संबंधित भागातील तापमान अधिक गरम असल्याचंही संशोधनात नमूद करण्यात आलंय.