हायलाइट्स:
- ममता बॅनर्जींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
- राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजप नेत्याचा आरोप
- भाजप नेत्याची मुंबई पोलीस आयुक्तांकडे इमेलद्वारे तक्रार
- भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली टीका
ममता बॅनर्जी यांनी खाली बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना त्या मध्येच थांबल्या. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान होतो, असे भाजप नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मेलद्वारे थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताची सुरुवात त्यांनी खाली बसूनच केली. त्या राष्ट्रगीत गात असताना मध्येच थांबल्या, असा आरोप या तक्रारीत केला आहे.
भाजप नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ‘ममता बॅनर्जी यांनी जाणूनबुजून राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. ममता बॅनर्जी यादेखील त्याच राज्यातील आहेत. ममतांनी केवळ राज्यातील नागरिकांचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे मी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती करतो की, त्यांच्याविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून त्याची चौकशी करावी,’ असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच, राष्ट्रगीताला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या, असं तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्यांनी चार ते पाच ओळी गायल्यानंतर थांबल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान तर केलाच, पण त्याचबरोबर संपूर्ण देशाचाही अपमान केला, असे ट्विट पश्चिम बंगाल भाजपने केले आहे.