कस्तुरबा रुग्णालय करोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांनी भरले आहे. त्यामुळे पालिकेने खासगी रुग्णालये व केईएम आणि नायर रुग्णालयाकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची करोना तपासणी केली जात असून एखादा प्रवासी संशयीत रुग्ण वाटल्यास थेट कस्तुरबामध्ये रवानगी केली जात आहे. संपूर्ण मुंबई आणि मुंबई बाहेरून कस्तुरबामध्ये रूग्ण येत असल्याने या रूग्णालयावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मागील २४ तासांत करोना पॉझिटिव्ह रुग्ण आणखी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून केईएम आणि नायर रूग्णालयात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. या दोन्ही रुग्णालयांत गंभीर आजाराने दाखल नसलेल्या रूग्णांना घेऊन जावे, नातेवाईकांना सांगण्यात आले आहे. ज्या रुग्णांवर आणखी उपचाराची आवश्यकता आहे अशा रुग्णांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरील उपनगरीय पालिका रुग्णालयांत भरती करावे तसेच पालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात यावे. उच्च रक्तदाब, अस्थमा, थायरॉइड, जेरियाट्रिक, डायबेटिक रुग्णांबाबतही हेच आदेश दिले आहेत. तर शस्त्रक्रिया झालेले व गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर रुग्णालयातच उपचार सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times