हायलाइट्स:

  • विजेच्या प्रश्नावर भर पावसात आंदोलन
  • संतप्त कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट
  • पोलिसांच्या वाहनाच्या काचाही फुटल्या

अहमदनगर : राज्यभर सध्या विजेच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं सुरू आहेत. राहुरीत गुरूवारी भर पावसात असंच आंदोलन सुरू होतं. महावितरण कंपनीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. चर्चेतूनही मार्ग निघत नसल्याने शेवटी पोलिसांनीही ठाम भूमिका घेत आंदोलकांची धरपकड सुरू केली. त्यामुळे अनेकांनी धूम ठोकली तर काहींची पोलिसांनी उचलबांगडी केली. संतप्त कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांच्या वाहनाच्या काचाही फुटल्या. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गावातच ही घटना घडली आहे. (वीज बिल बातम्या)

राहुरीत नगर-मनमाड महामार्गावर राहुरी बाजार समितीच्या समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. शेती पंपाची वीज बिल सक्तीची वसुली ताबडतोब बंद करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावं, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या. आंदोलन सुरू होऊन १५ मिनिटे झाल्यावर पोलीस आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे घटनास्थळी दाखल होताच पोलीस फौजफाट्याने आक्रमकपणे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली, असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. तर काही कार्यकर्त्यांची उचल बांगडी करून ताब्यात घेतले.

जगाला ‘ओमिक्रॉन’ची चिंता; मात्र राज्यातील ‘या’ जिल्ह्यासाठी आली दिलासादायक बातमी

यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलीस वाहनाच्या खिडकीची काचही फुटली. पोलिसांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला होता. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन मोडून काढल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड सुरू होती.

त्यानंतर प्रहार संघटना, आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू साळवे, आरपीआयचे बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास साळवे, लहानु तमनार, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या शहरातच हे आक्रमक आंदोलन झाले. पोलिसांनी ते मोडून काढल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी या प्रकारावर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here