मध्यंतरीचा काही कालावधी वगळता शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबविणे सुरू झाले, त्याला औरंगाबादकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याने औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत गेला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन विषाणूमुळे जगाची चिंता वाढवली आहे. गुरुवारी भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली. मात्र शुक्रवारी करोना रुग्णांच्या अहवालानंतर अत्यंत दिलासाजनक बातमी समोर आली. शुक्रवारी औरंगाबाद शहरात १४२३ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या, गुरुवारी ४७९ आरटीपीसीआर चाचण्या गेल्या होत्या, त्यापैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरवासियांनी तब्बल २० महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शुक्रवारी तीन करोनाबाधितांची भर पडली.
उस्मानाबादलाही दिलासा
उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी ९५६ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी एकही जण करोनाबाधित आढळून आला नाही. गेल्या आठवडाभरापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा पाचच्या आत असल्याचे नोंदविले गेले.
लस घ्या, त्रिसूत्री पाळा
औरंगाबाद शहरात शुक्रवारी एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. मात्र शहरवासियांनी गाफिल न राहता लसीकरण करुन घ्यावे. घराबाहेर पडताना मास्क लावावा, सॅनिटायझर आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.