म. टा. प्रतिनिधी,

पुणे शहरात रस्त्यांवर अनिर्बंधपणे फिरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यात येत असून पोलिसांकडून शहरातील रस्त्यांवर ३१ मार्चपर्यंत वाहने चालविण्यास मनाई करण्याचे आदेश काढला आहे. या मनाई आदेशाची अंमलबजावणी आज दुपारी तीन वाजल्यापासूनच करण्यात येणार आहे.

या आदेशान्वये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर, वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन व्यवस्था, पोलीस, अग्निशमन, कर्तव्यावर असलेले सरकारी-निमसरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ यांच्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागातही जमावबंदी

दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठीही फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ (१) व (३) नुसार ३१ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. जिल्हाधिकारी राम यांनी रविवारी रात्री नऊ ते सोमवारी पहाटे पाचपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी जमावबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठीही ३१ मार्चपर्यंत जमावबंदी असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र येतील अशा प्रकारचे कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here