म. टा. खास प्रतिनिधी,

‘ बांधणीचा विचार करताना अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या उंचीशी या स्मारकाची तुलना करणे हा आक्रस्ताळेपणा आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ लेखक आणि पानिपतकार यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ‘शिवस्मारकाचा विचार करताना आपण अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा विचार करतो. स्वातंत्र्यदेवतेच्या उंचीएवढी स्मारकाची उंची असायला हवी, असा विचार करणे हा आक्रस्ताळेपणा आहे. स्वातंत्र्यदेवीचा इतिहास सन १८६५चा आहे. शिवरायांचा इतिहास त्याहून २००वर्षे अधिक ज्येष्ठ आहे. शिवस्मारक करा, पण शिवरायांच्या स्मृती आमच्या दुर्लक्षामुळे नष्ट होत असून, त्या जपणे आपण सर्वांची जबाबदारी आहे,’ अशी जाणीव त्यांनी करून दिली.

‘राजापूरच्या वखारीसारख्या शिवकालीन स्मृती आपण जपल्या नाहीत, तर पुढील पिढीला काय सांगणार,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे यांना मराठी साहित्यिकांनी साहित्यिकच मानले नाही, याबद्दलची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

‘पानिपत ही कादंबरी मी आणि तात्यासाहेब यांच्या नात्याचे प्रमुख कारण आहे. तात्यासाहेब हे अजंठा, तर वसंत कानेटकर हे माझ्यासाठी वेरूळ आहेत,’ असे पाटील म्हणाले. अभिजात भाषेचा बहुमान तमिळ आणि कन्नड या भाषांना मिळू शकतो, तर माय मराठीला तो का मिळू नये, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

‘द्वारपालाची धोती का ओढता?’
ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगाराकडे, न मिळणाऱ्या वेतनाकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. ‘रोजगार हमीवरील मजुरांपेक्षा कमी पगार या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळतो, हे दुर्दैव आहे. सरकार कोणतेही असू दे, जेव्हा अर्थसंकल्पात कपात करायची असते, तेव्हा पहिला फटका ग्रंथपालांच्या पगारावर पडतो. लेखक व कलावंतांच्या मानधनावर गदा आणली जाते. राजाच्या मखमली अंगरख्याला कपडा कमी पडला म्हणून, द्वारपालाची धोती ओढायला निघालात, हे काय आहे,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नोकरशाहीतील खदखद व्यक्त

अनेक वर्षे रखडलेले शिर्डी येथील विमानतळाचे काम मी १४ महिन्यांत पूर्ण केले. परंतु, नागरी व्यवस्था व नोकरशाही परंपरेत येत असलेल्या वाईट अनुभवाबाबतचे कथन पाटील यांनी केले. ‘माझ्या विरोधात काही वरिष्ठांनी स्वरचित तमाशा उभा केला आहे. मोजक्या माध्यमांना हाताशी धरून हे काम होत असले, तरी यामुळे कुटुंबाला त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे विचारात घ्यायला हवे,’ अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here