मुंबई : वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एका बाजूला न्यूझीलंडच्या एजाज पटेलने भारताच्या १० विकेट घेऊन ऐतिहासिक अशी कामगिरी केली. तर दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव फक्त ६२ धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल न्यूझीलंडला पहिल्या डावात फक्त ६२ धावा करता आल्या. पहिल्या डावात भारताने तब्बल २६३ धावांची आघाडी घेतली आहे.
मुंबई कसोटीचा दुसरा दिवस एजाज पटेलने गाजवला. त्याने एकट्याने भारताच्या १० विकेट घेतल्या. पण त्याच्या या विक्रमी कामगिरीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाणी फेरले. भारतीय गोलंदाजांसमोर पाहूण्या संघाने शरणागती पत्करली. भारतीय गोलंदाजासमोर न्यूझीलंडचा डाव फक्त ६२ धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या ६ षटकात न्यूझीलंडला ३ धक्के दिले. त्यामुळे त्यांची अवस्था ३ बाद १७ अशी झाली होती. त्यानंतर अक्षर पटेलने चौथा धक्का दिला. एक वेळ अशी होती की न्यूझीलंडचा संघ ५० धावांचा टप्पा पार करेल का अशी शंका वाटत होती. न्यूझीलंडकडून फक्त दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. गोलंदाज म्हणून संघात असलेल्या कायले जेमीसनने सर्वाधिक १७ धावा केल्या. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. सिराजने ३ , अक्षर पटेलने २ तर जयंत यादवने १ विकेट घेतली.