हायलाइट्स:
- अलिबागमधील वरसोली समुद्रकिनारी दुर्घटना
- पॅरासेलिंग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात पडल्या
- समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईतील दोन्ही महिला बालंबाल बचावल्या
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू केल्यानंतर या कालावधीत पर्यटन बंद होते. राज्य सरकारने करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता आणली. त्यानंतर ठिकठिकाणची पर्यटनस्थळे पुन्हा गजबजू लागली. लॉकडाउनच्या काळात घराबाहेर न पडणारे नागरिक आता पर्यटनासाठी देशभरासह राज्यात विविध ठिकाणी भेटी देत आहेत. पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीच्या असलेल्या अलिबागमधील समुद्रकिनारीही पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, येथील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अलिबागच्या वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना अचानक दोर तुटला आणि दोन महिला पर्यटक समुद्रात पडल्या. सुदैवाने या घटनेत दोन्ही महिलांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेतून दोन्ही महिला बचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काही जण पर्यटनासाठी अलिबागला आले होते. त्यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलिंग करण्यासाठी गेल्या. पॅरासेलिंग करताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात पडल्या. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, पर्यटक आणि व्यावसायिकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. आम्ही पर्यटकांच्या सुरक्षेची खबरदारी घेतो, यापुढेही सर्व काळजी घेतली जाईल, असे पॅरासेलिंग व्यावसायिक संजय पाटील यांनी सांगितले.
काय झालं नेमकं?
या घटनेबाबत पॅरासेलिंग व्यावसायिक संजय पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. या दोन्ही महिला पर्यटक आमच्याकडे पॅरासेलिंगसाठी आले होते. पॅरासेलिंग करताना अचानक विंचमधून दोरी निघाली आणि दोन्ही महिला पाण्यात पडल्या. लाइफ जॅकेट असल्याने त्यांना काहीही झालं नाही. कोणतीही दुखापत झाली नाही. त्या समुद्रात पडल्यानंतर ऑपरेटरने त्यांना तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते. जितकी सुरक्षा देता येईल, तितके प्रयत्न आम्ही करतो, असे पाटील यांनी सांगितले.