हायलाइट्स:
- शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे अडचणीत
- बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल
- घरी जाऊन धमकावून अत्याचार केल्याचा आरोप
गोविंद मोकाटे हा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा राजकीय विरोधक आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाटलेल्या विषारी दारूमुळे नऊ जणांना बळी गेल्याच्या घटनेत काही वर्षांपूर्वी त्याला अटक झाली होती. नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात मोकाटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने एका सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे.
मोकाटे या महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार करत होता. कोणाला काही सांगितलं तर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकीन, अशी धमकीही तो देत होता, त्यामुळे आपण इतके दिवस फिर्याद देण्यासाठी आलो नाही, असं त्या महिलेनं म्हटलं आहे. याशिवाय मोकाटे याने महिलेला सोशल मीडिया आणि मोबाईलवरून संर्पक करूनही त्रास दिल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मोकाटे तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथील शिवसेनेचा पदाधिकारी आहे. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याची मुलगी उमेदवार होती. त्यावेळी एका प्रचार सभेनंतर मतदारांना वाटण्यात आलेली दारू विषारी निघाली. त्यामुळे नऊ जणांचा बळी गेला होता तर अनेकांना अंधत्व आलं. याप्रकरणी दारू तयार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यासोबतच मोकाटे व त्याच्या मुलीविरुद्धही गुन्हा दाखल झाला होता.
तेव्हापासून मोकाटे आणि कर्डिले यांच्यातील वैर वाढले आहे. त्यावेळी या विषारी दारूकांडात कर्डिले यांनी आपल्याला जाणीपूर्वक अडकवल्याचा आरोप मोकाटे याने केला होता. गेल्या आठवड्यातही पत्रकार परिषदेत त्याने कर्डिले यांच्याविरुद्ध हाच आरोप पुन्हा केला होता. कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली वीज प्रश्नांवर आंदोलन झाले होते. त्यावरून लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या कर्डिलेंकडून ही नौटंकी केली जात असल्याचा आरोप मोकाटे याने केला होता.
दरम्यान, या विवाहित महिलेनं फिर्यादी म्हटलं आहे की, २०१८ पासून मोकाटे मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता. मी तीन वेळा ती नाकारली. त्यानंतर मोकाटे याने मला मेसेज करून महत्वाचं काम आहे, असं सांगत रिक्वेस्ट स्वीकारण्याची विनंती केली. मी कोणी ओळखीचं असेल असं वाटल्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर तो वारंवार अश्लील मेसेज पाठवू लागला. त्यामुळे मी तो नंबर ब्लॉक केला. यानंतर मोकाटे याने माझ्या पतीशी ओळख वाढवून आपण खूप प्रवास करत असल्याने पाठ-कंबर दुखते असे सांगून विनंती करून माझ्या घरी येऊन पतीकडून मसाज करून घेतला. त्यातून ओळख वाढवली. त्यानंतर पती घरी नसतानाही तो येऊ लागला. मला धमकावून अत्याचार करू लागला. माझे एका पक्षातील मोठ्या लोकांशी संबंध आहेत, कोणी काही करू शकत नाही, अशा धमक्या देत होता. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने मी गोविंद अण्णा मोकाटे याच्याविरोधात फिर्याद देत आहे, असं या विवाहित महिलेनं म्हटलं आहे.