हायलाइट्स:
- डोंबिवली रेल्वे स्थानकातील थरारक घटना
- महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी वाचवले महिलेचे प्राण
- डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आज सकाळी एका महिलेचे प्राण वाचवले, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. आज सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच येथे एक महिला धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती फलाटावर पडली. फलाटावरून घसरत जात ती लोकलखाली सापडणार होती, तोच तिथे तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान विवेक पाटील आणि किरण राऊत या दोघांनी प्रसंगवधान राखून धाव घेतली आणि महिलेला त्वरित बाजूला केले. या महिलेने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या त्या दोन जवानांचे, रेल्वे पोलिसांचे आणि आरपीएफचे आभार मानले. त्या दोन जवानांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर धावती लोकल पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. प्रवाशांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करू नये. प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुकेश ढगे यांनी केले आहे.
‘त्या’ प्रवाशाचा मृत्यू
डोंबिवली रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन पडल्याने एक ५६ वर्षीय प्रवासी जखमी झाला होता. या प्रवाशाचा मृत्यू झाला. नामदेव गावित असे या प्रवाशाचे नाव असून, केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ते काम करत होते. ड्युटी संपवून ते कल्याण येथे घरी निघाले होते. डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर १ वाजून ०३ मिनिटांची कल्याण दिशेला जाणारी लोकल पकडताना त्यांचा तोल गेला आणि अपघात झाला. त्यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.