हायलाइट्स:

  • राज्यात पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचं निदान
  • डोंबिवलीमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणाला झाली बाधा
  • तरुणावर डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू

मुंबई : जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर महाराष्ट्रानेही सावधगिरी बाळगत प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता अखेर राज्यात पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचं निदान झालं आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा करोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याचं प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट झालं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत आला होता. (ओमिक्रॉन कोरोनाव्हायरस नवीन प्रकार)

ओमिक्रॉन बाधित आढळलेला हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला, मात्र इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसने चिरडले: एकाने गमावले प्राण; दुसऱ्याचा मृत्यूशी संघर्ष

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १२ अतिजोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, आता राज्यातही ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात करोना निर्बंध आणखी कठोर केले जातात का, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here