हायलाइट्स:
- अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा तडाखा
- पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
- कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केला प्राथमिक अहवाल
द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवरील नुकसान झालं आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शनिवारी राज्य शासनाकडे सादर केला. द्राक्षबागांचे नुकसान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलं नसलं तरी सुमारे १३ ते १५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारकडून मात्र अद्यापही नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये सरकारच्या विरोधात नाराजी आहे.
सांगली जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे मुसळधार पाऊस पडला, तर गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी अधूनमधून पाऊस सुरूच आहे. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव, इस्लामपूर, वाळवा, शिराळ्याला पावसाने झोडपून काढलं. जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्यात असणार्या द्राक्ष बागांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं.
द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. रब्बीच्या पिकांनाही पावसाचा फटका बसला. भाजीपाल्याचंही मोठे नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करीत प्राथमिक माहिती घेतली.
आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, मिरज, कडेगाव, पलूस, जत तालुक्यांतील ३८४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जोरदार पावसामुळे नऊ तालुक्यातील ३८४ गावांमधील २६ हजार ८४२ शेतकर्यांच्या १० हजार ६३९.४७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबांगांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड खराब होण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असून राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे.