सिनेमातले ‘मूळ’ असलेले त्याचे विनोदी संवाद पटकथेत चपखल बसले नाहीत. चित्रपट चकचकीत आणि कलाकारांच्या अभिनयाचा साज चढलेला आहे. पांडू आणि महादू अर्थात भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची जोडी पडद्यावर धमाल करते. त्यांचं वावरणं चेहऱ्यावर हसू आणणारं आहे. अभिनयात सोनाली कुलकर्णीनं भाऊ आणि कुशलला समर्पक साथ दिली आहे. दिग्दर्शक म्हणून विजूनं उषा या भूमिकेच्या हाती कथानकाचा हुकमी एक्का दिला आहे. हा एक्का नेमका काय आहे, हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल. पूर्वार्धाच्या तुलनेत काही अनपेक्षित गोष्टी उत्तरार्धात कथानकाला वेगळं वळण देतात आणि सिनेमातला ट्विस्ट आपल्याला भुवया उंचावायला भाग पाडतो.
कथानकात पांडू आणि महादू हे वगनाट्य, बतावणी करणारे कलाकार आहेत. एका राजकीय कार्यक्रमात ते पुढारी बाबासाहेब यांच्या नजरेत येतात. बाबासाहेबांच्या शिफारशीनं ते पोलिस खात्यात भरती होतात. एकीकडे पांडू-महादूचा पांडू हवालदार आणि महादू हवालदार होतो, तर दुसरीकडे राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या बाबासाहेबांवर वारंवार जीवघेणा हल्ला होत असतो. दरम्यान पांडू आणि उषाचं लग्नही झालेलं असतं. महादू अंगावर वर्दी आल्यानं काहीसा भ्रष्ट होतो, तर पांडू प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडत असतो. कर्मधर्म संयोगानं पांडूच्या हातून विविध गुन्हेगारी कट उघडकीस येतात. या सगळ्यात पांडू आणि महादू आपल्या अतरंगी वागण्यानं मनोरंजन करतात; हे दोघं कशाप्राकारे बाबासाहेबांवर हल्ला करणाऱ्याला पकडतात, की बाबासाहेबांचाच यात घात होतो हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. प्राजक्ता माळी, प्रवीण तरडे, उदय सबनीस, हेमांगी कवी यांनीही आपापल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या आणि निर्मितीमूल्यात सिनेमा देखणा आहे.
पांडू
निर्मिती ः झी स्टुडीओज्
लेखन-दिग्दर्शन ः विजू माने
कथा, पटकथा ः विजू माने, कुशल बद्रिके
संवाद ः राजेश देशपांडे, समीर चौघुले
कलाकार ः भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, प्रवीण तरडे, प्राजक्ता माळी
छायांकन ः शब्बीर नाईक
संकलन ः प्रतीक एस. पाटील
संगीत ः अवधूत गुप्ते
दर्जा ः तीन स्टार